दहिवेल-कोंडायबारी परिसरात बिबट्याचा वावर; रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सतर्कतेचे आवाहन
प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल आणि कोंडायबारी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल दहिवेल परिसरात बिबट्याचे थेट दर्शन झाल्याने प्रवाशांची आणि स्थानिकांची झोप उडाली आहे. हा बिबट्या महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडीझुडपांमध्ये दबा धरून बसत असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे अचानक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, दहिवेल आणि कोंडायबारी घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे किंवा अत्यावश्यक असल्यास समूहाने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला थांबणे किंवा निर्जन स्थळी वाहने उभी करणे धोक्याचे ठरू शकते.
वनविभागाने या भागात गस्त वाढवली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला किंवा पोलिसांना कळवावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.













