नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण झाल्यावर शासनाकडून निश्चीतपणे मदत– मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण झाल्यावर शासनाकडून निश्चीतपणे मदत— मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

 

फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी

 

सातारा, दि.31: सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत फलटण, माण, खटाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन भरपाईसाठी त्वरीत सादर करावेत, एकत्रितपणे पंचनामे राज्यशासनाला प्राप्त झाल्यावर शासन निकषानुसार निश्चितपणे मदत करेल अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

 

फलटण तालुक्यातील फलटण शहरासह बाधित गावांची भेट देऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे, प्रभारी गट विकास अधिकारी श्री. कुंभार आदी उपस्थित होते. 

 

गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात मान्सून पूर्वी असा पाऊस कधी झाला नसून असा प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे पाहणी प्रसंगी सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार अतिवृष्टीने घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. शेतपीकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले असून बागायती व फळपिकांखालील क्षेत्र बाधित झाले आहे. अंगणवाडी, शाळांसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरेही मयत झाली आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून राहिलेले पंचनामे पूर्ण करण्याचे युध्दपातळीवर काम सुरु आहे. 

भरपाईसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठीच्या सूचना मदत व पुनर्वसन विभागाकडून दिल्या आहेत. यंत्रणांनी पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत. रस्ते, पूल, बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे, काही ठिकाणी नदीचे पात्र बदलले आहे. त्यांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तात्काळ सादर करावेत अशा सुचना दिल्या. 

 

अतिवृष्टीने ज्या घरात पाणी शिरले आहे, त्या घरातील नागरिकांना स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची, रेशनची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून व सेवाभावी संस्थाकडून करण्यात आली आहे, अशी माहितीही मकरंद पाटील यांनी दिली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें