गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाचे तीनतेरा!

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाचे तीनतेरा!
⭕ आरोग्य व्यवस्थेचे विविध प्रश्न अधिवेशनात गाजणार.?
⭕ डॉक्टरांची वानवा, आदिवासी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. आरोग्य यंत्रणा आजारी❓
⭕ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांना भ्रष्ट कामे करण्यासाठी आशिर्वाद ❓
नागपूर: (चक्रधर मेश्राम) दि.२४/११/२०२६:- गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे आजारपण काही केल्या दूर होण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेले डॉ. मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तरीही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था वारंवार गंभीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. राज्यात १हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविल्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी तब्बल ३५ जण रुजू झाले नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना साध्या उपचारांसाठीही डॉक्टर उपलब्ध होत नसतील, तर विकासाच्या घोषणांचा सामान्य जनतेला उपयोग तरी काय ❓असा संतप्त प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात १४४० डॉक्टरांची भरतीत गडचिरोलीच्या वाट्याला आलेल्या ४० पैकी केवळ पाच डॉक्टर रुजू झाले❓राज्य सरकारच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एकूण १ हजार ४४० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत १ हजार ३७९ वैद्यकीय उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती आहे. यामध्ये एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि पॅथॉलॉजी तज्ज्ञ अशा विविध पदांचा समावेश होता.
या भरती प्रक्रियेतून गडचिरोली जिल्ह्यासाठी ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात केवळ पाच वैद्यकीय अधिकारीच जिल्ह्यात रुजू झाले, तर उर्वरित ३५ वैद्यकीय अधिकारी अद्याप रुजू झाले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नियुक्त्या होऊनही गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेला डॉक्टर मिळणार कधी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील आमदार, तरीही आरोग्य व्यवस्थेचे दुखणे कायमचे बंद झाले नाही.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ. मिलिंद नरोटे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यविषयक प्रश्नांना प्राधान्य मिळेल आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, अशी नागरिकांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.
मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे प्रश्न अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता, रिक्त पदे आणि दुर्गम भागातील आरोग्य सोयी सुविधांचा अभाव यांसारख्या अनेक समस्या वारंवार समोर येत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आमदार असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व असतांना जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची अशी गंभीर अवस्था का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. मात्र यातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या भोंगळ कारभारामुळे भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ संयुक्ता निमजे यांना न्यायालयीन आदेशाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत सेवा मुक्त करुन अन्याय केला आहे. या अन्याया विरोधात दाद मागण्यासाठी आता डॉ.निमजे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे. डॉ प्रताप शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या औषध घोटाळ्याची, कुपोषण, माता बाल मृत्यू , कुरखेडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजिता वाडीवे यांच्या तक्रारी विषयक माहिती, ब्रम्हानंद तिवाडे यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती आणि त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी दिलेली उत्तरे , सिएचओ मुख्यालयी उपस्थित राहून आरोग्य सेवा देत नसल्याने आदिवासी , दुर्गम भागात होणारी रुग्णांची दुरावस्था , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांची कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणूक , जिल्ह्यातील गरोदर माता मृत्यूचे प्रमाण यासारख्या अनेक बाबी येत्या हिवाळी अधिवेशन काळात चांगल्याप्रकारे गाजणार आहेत.
गडचिरोली जिल्हातील दुर्गम आणि जंगलव्याप्त भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हेच उपचाराचे प्रमुख ठिकाण असते. मात्र येथेच डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे?
गर्भवती महिला, नवजात बालके, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या अनुपलब्धतेचा मोठा फटका बसू शकतो. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी तालुका किंवा जिल्हा मुख्यालय गाठावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास करण्याचे नियोजन सुरू आहे. स्टील उद्योग, खाणकाम आणि विविध औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्यावर शासनाचा भर आहे. मात्र जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत अशीच तत्परता का दिसत नाही?
जिल्ह्यात मोठमोठे उद्योग उभारले जात असताना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसतील, तर हा विकास नेमका कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औद्योगिक विकासाबरोबरच आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. अन्यथा विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष जनतेच्या जीवनातील परिस्थिती यामध्ये मोठी दरी कायम राहणार आहे.
राज्यातील वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत विविध परिमंडळांमधून प्राप्त झालेल्या उमेदवारांची संख्या आहे.
| परिमंडळ | उमेदवार |
ठाणे – १०२ , पुणे १४९ ,
नाशिक १८३, कोल्हापूर ५१ , छत्रपती संभाजीनगर १४३ , लातूर १६९ , अकोला २४३ , नागपूर २६९
प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी; केवळ नियुक्ती आदेश काढून उपयोग काय?
गडचिरोली जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेले ३५ वैद्यकीय अधिकारी अद्याप रुजू का झाले नाहीत, याची आरोग्य विभागाने स्पष्ट माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. दुर्गम भागात नियुक्ती मिळाल्यानंतर डॉक्टर रुजू होण्यास टाळाटाळ करीत असतील, तर त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
डॉक्टरांना आवश्यक निवासव्यवस्था, सुरक्षितता, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधा मिळतात का, याचाही आढावा घेण्याची आवश्यकता आहे. नियुक्ती आदेश काढणे ही केवळ पहिली पायरी आहे. संबंधित डॉक्टर प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात रुजू होऊन रुग्णांना सेवा देत आहेत की नाही, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
गडचिरोली जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाने रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वातील जिल्ह्यातच आरोग्य विभागाची अशी अवस्था का निर्माण झाली हा एक गहन प्रश्न आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व असताना, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मिलिंद नरोटे आमदार असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न कायम राहणे ही निश्चितच गांभीर्याने दखल घेण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे.
आता प्रश्न केवळ ३५ डॉक्टर रुजू झाले नाहीत एवढेच नाही, तर गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी भागातील हजारो नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार कधी, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटवार , जिल्हा आरोग्य प्रशासन तसेच आमदार म्हणून डॉ. मिलिंद नरोटे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणार का? की गडचिरोलीच्या जनतेला डॉक्टरांविना आरोग्यसेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वातील जिल्ह्यातच डॉक्टरांची नियुक्ती होऊनही ते रुजू होत नसतील, तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन