किसनवीरच्या कारभाऱ्यांनो, ६३ हजार सभासदांच्या हक्काची साखर कधी देणार?
सणासुदीला तरी शेतकऱ्यांच्या घरात गोड होऊ द्या; अन्यथा कारखान्याच्या दारात तीव्र लढा अटळ!
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
गेल्या ५-६ वर्षांपासून ‘किसनवीर’च्या ६३,००० शेतकरी मालक-सभासदांचे प्रति शेअर १५,००० रुपये भागभांडवलाच्या रूपाने कारखान्यात अडकले आहेत. या कष्टाच्या पैशांवर ना कधी व्याज मिळाले, ना कधी लाभांश (Dividend)!
वर्तमान संचालक मंडळाने कारभाराची धुरा हाती घेतली, तेव्हा गावोगावी बैठकांचा धडाका लावला. “कारखाना वाचवायचा आहे, चालवायचा आहे, नवीन शेअर्स घ्या,” असे आवाहन केले. त्यावेळी आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी जाहीर आश्वासन दिले होते की— “जो शेतकरी नवीन शेअर घेईल, त्याला प्रति शेअर ७० किलो साखर दिली जाईल!”
बळीराजाने नेत्यांच्या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला. १५,००० रुपयांच्या शेअरसाठी प्रसंगी पदरमोड करून, ७,००० रुपये व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांनी तब्बल ४३ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स खरेदी केले!
घरातील माता-भगिनींची माफक अपेक्षा होती— व्याज नाही मिळाले तरी चालेल, पण निदान दिवाळी-दसरा या सणासुदीला हक्काच्या कारखान्याची हक्काची साखर तरी घरात येईल. पण दुर्दैव! गेल्या ४ वर्षांत नेत्यांनी केवळ गाजराची आश्वासनं दाखवली. प्रत्यक्षात एका रुपयाचीही साखर सभासदांच्या घरात पोहोचली नाही! आज अवस्था अशी झाली आहे की, कारभाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांमुळे घरात महिलांकडून शेतकऱ्यांची मानहानी आणि चंपी होत आहे.
आमचा थेट आणि स्पष्ट सवाल आहे:
शेतकऱ्यांच्या ४३ कोटींवर कारभार हाकणाऱ्यांना दिलेल्या शब्दाचा विसर पडलाय का?
हक्काच्या घामाचा लाभांश तर बुडवला, पण ७० किलो साखरेचे आश्वासनही हवेतच विरघळले का?
भूमिपुत्र संघटनेचा स्पष्ट इशारा:
या गळीत हंगामात किसनवीर कारखान्याने प्रत्येक सभासदाला प्रति शेअर ७० किलो साखर तत्काळ दिलीच पाहिजे!
कारखाना प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तात्काळ योग्य निर्णय घेतला नाही, तर समस्त ऊस उत्पादक सभासदांना सोबत घेऊन कारखान्याच्या कार्यस्थळावर उग्र आणि धडक आंदोलन छेडले जाईल!
आपला,
प्रवीण ज्ञानेश्वर बाबर
अध्यक्ष – भूमिपुत्र संघटना
(माजी संचालक, किसनवीर साखर कारखाना)













