निव्वळ एकाच साक्षीवर आरोपीस शिक्षा; चाळीसगाव न्यायालयाचा निकाल
चाळीसगाव प्रतिनिधी :-
विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस केवळ एका साक्षीदाराच्या साक्षीच्या आधारे चाळीसगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली. आरोपी अशोक सदाशिव जाधव यास भा.दं.वि. कलम ३५४ व ४५२ अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३६/२०२२ तसेच फौजदारी खटला क्रमांक ४०/२०२३ मध्ये आरोपी अशोक सदाशिव जाधव याच्याविरुद्ध सुनावणी झाली. सदर प्रकरणात आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी तीन साक्षीदार फितूर झाले. मात्र, फिर्यादीची साक्ष तसेच तपासी अधिकारी पंकज पंदरीनाथ पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.
न्यायालयाने भा.दं.वि. कलम ३५४ अंतर्गत आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये नुकसानभरपाई, तर कलम ४५२ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अड. रमेश खंडू माने यांनी जोरदार बाजू मांडली. चाळीसगाव कोर्ट क्रमांक १ यांनी सरकार पक्षातर्फे न्यायनिवाड्यासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे दाखल केले. त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता अड. राकेश प्रभाकर चौधरी व अड. शशिकांत शिवाजी माने यांनी सहकार्य केले. सरकारी वकिलांना मदत म्हणून अड. मयूर अरुण निकम, अड. मयूर लक्ष्मण कुमावत तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी सहकार्य केले. तपासातील कामगिरीबद्दल पोलीस यंत्रणेचेही योगदान महत्त्वाचे ठरले.













