“इशारा देऊनही दुर्लक्ष… अखेर खांब कोसळले! सांगवीत NDMJ चा महावितरणला थेट जाब”
फलटण प्रतिनिधी
सांगवी (ता. फलटण) : राजे कुरण बंगला परिसरात महावितरणमार्फत सुरू असलेल्या नवीन विजेच्या खांबांच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वीजवाहिनी सुरू होण्यापूर्वीच नव्याने बसविण्यात आलेले काही विजेचे खांब वाऱ्याने कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) च्या वतीने आज महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना सविस्तर निवेदन देऊन तातडीने चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वीही “सातारा सम्राट” या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या माध्यमातून राजे कुरण बंगला पाण्याच्या फाट्यालगत असलेल्या धोकादायक अवस्थेतील विजेच्या खांबांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. पावसाळ्यात हे खांब कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, महावितरण प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, नव्याने बसविण्यात आलेले खांबही वाऱ्याने कोसळल्याने संबंधित काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा संशय अधिक बळावला आहे. परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा तसेच शेतीची कामे सुरू असल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
NDMJ चे अध्यक्ष जय हणमंत माने यांनी सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, धोकादायक व कललेले सर्व खांब तात्काळ बदलावेत आणि संपूर्ण लाईनची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.
महावितरण प्रशासन या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करणार की पुन्हा एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









