चाळीसगावात भव्य मोफत 500 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स, बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व पूज्य रामदेवजी बाबा आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य बापजी महाराज यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ भव्य मोफत 500 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. 04 जून 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे.या शिबिरात प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ
डॉ. महेश पाठक (MBBS, MS Ophthalmology) यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टीदोष, डोळ्यावरील साय, डोळ्यांची जळजळ व इतर समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक रुग्ण आर्थिक अडचणींमुळे वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. अशा गरजू रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शिबिरात तपासणी झालेल्या व शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांच्या मोतीबिंदू व इतर नेत्रशस्त्रक्रियांना शिबिरानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. आवश्यक सर्व वैद्यकीय प्रक्रिया व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया पार पडतील. या उपक्रमामुळे शेकडो रुग्णांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण होणार असून अनेकांना दृष्टीदोष व अंधत्वापासून मुक्ती मिळणार आहे. चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.












