ग्रामपंचायत कार्यालय दारुड्यांचा अड्डा!
नारंडा येथील नागरिकांचा भरदिवसा वरांड्यातच दारू पिऊन धिंगाणा
चंद्रपूर प्रतिनिधी :मनोज गोरे
कोरफना तालुक्यातील नारंडा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा वरांडा सध्या दारुड्यांचा अड्डा बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. काही नागरिक ग्रामपंचायत कार्यालयातच दारू पिऊन, बेशुद्ध अवस्थेत वरांड्यात आराम करत असल्याचे प्रकार सातत्याने घडत असून, यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे.
ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी असते. मात्र याच ठिकाणी काही जण खुलेआम दारू पिऊन पडून राहत असल्याने महिला, वृद्ध व विद्यार्थी यांना कार्यालयात जाण्यास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा असे प्रकार घडत असताना ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व सचिव यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, यापूर्वीही अशा प्रकारांच्या तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत कार्यालयात शिस्त, स्वच्छता व सुरक्षितता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना दारुड्यांना मोकळे रान देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी होत असून तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. संबंधित दारुड्यांवर गुन्हा दाखल करावा तसेच कार्यालय परिसरात सीसीटीव्ही, पहारेकरी व पोलिसांचा नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासन यावर काय कारवाई करणार?
हा प्रश्न आता संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनला आहे.









