गडचिरोली जुनगावमध्ये कोट्यवधीचा अवैध वाळूसाठा?
👉 अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.
नागपूर ( चक्रधर मेश्राम) :-
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील अवैध वाळू साठ्याचे प्रकरण ताजे असतानाच जिल्हा मुख्यालया जवळील कठानी नदीला लागून असलेल्या शेती घाटातून वाळूचा अवैध उपसा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी संबंधित तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लिखित अहवाल सादर केला आहे. परंतु वाळू माफियांसोबत काही अधिकाऱ्यांचे असलेल्या मधुर आणि खट्टे ..मिठ्ठे संबंधामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा केली जात आहे.
पावसाळा संपतात जिल्ह्यात शासकीय वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. सोबतच शेतात साचलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी देखील शेती घाटाच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. मात्र, याचा फायदा घेत काही वाळू माफिया मशीनच्या साहाय्याने थेट नदीतून वाळू उपसा करून ‘रॉयल्टी’पेक्षा अधिक वाळूसाठा करून ठेवत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा मुख्यालयाला लागून असलेल्या जुनगाव पॅच मध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे.
४ डिसेंबर रोजी संबंधित तलाठीने तपासणी केली असता जवळपास ९०० ब्रास अधिक वाळूसाठा आढळून आल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. सोबतच तहसीलदारांकडे सुद्धा हा अहवाल कारवाईसाठी गेलेला आहे. मात्र, संबंधित वाळूमाफिया हा एका मोठ्या राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने काही अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. अवैध वाळू साठ्याचा बाजारभाव कोट्यवधीच्या घरात असल्याने काही महसूलच्या अधिकाऱ्यांनी आपले उखड पांढरे करून घेतल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
तांत्रिक कारण पुढे करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
संबंधित अवैध वाळू साठा हा प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक आहे. मात्र, वाळू माफियाला वाचवण्यासाठी महसूलमधील काही अधिकारी तांत्रिक कारण पुढे करून प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात आहेत ❓ बामणी येथेही असाच प्रकार सुरु असून अधिकारी ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी सिरोंचा येथे देखील असेच प्रकरण समोर आले होते. मात्र, खनीकर्म अधिकाऱ्याने चौकशी आधीच ‘क्लीनचिट’ दिली होती. चौकशीनंतर संबंधितांवर २९ कोटींचा दंड ठेवण्यात आला होता. तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित झाले होते. हे विशेष. या प्रकरणातील अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला आहे. सर्व तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येईल. असे तहसीलदार सागर कांबळे, गडचिरोली यांनी सांगितले













