दालमिया सिमेंट विरोधात सांगोडा शेतकरी आक्रमक!
भर पावसातही आमरण उपोषणाचा तिसरा दिवस; प्रशासनाची दिरंगाई
प्रतिनिधी – मनोज गोरे, कोरपना (चंद्रपूर)
सांगोडा गावात अन्यायाविरुद्ध लढ्याची ठिणगी पडली आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीने दालमिया सिमेंट कंपनीला जमीन दिल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी 23 सप्टेंबरपासून तहसील कार्यालय कोरपना समोर आमरण उपोषण सुरू केले. आज तिसरा दिवस असून, मुसळधार पावसात भिजत असतानाही आंदोलन सुरू आहे. पण प्रशासन मात्र कानावर हात ठेवून बसल्याने संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांचा आक्रोश – अन्याय सहन नाही!
सांगोडा गावच्या शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. 10 सप्टेंबर रोजी दिलेले लेखी निवेदन धुळखात पडले असून, कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. गावकऱ्यांना विश्वासात न घेता दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यापासून ते स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यापर्यंत अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.
मुख्य मागण्या अशा:
गावकऱ्यांना विश्वासात न घेता दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करावे.
ग्रामपंचायतीतील आर्थिक भ्रष्टाचाराचा तपास व वसुली करावी.
विस्तार अधिकारी दादाराव पवार यांच्यावर कारवाई व्हावी.
कंपनीकडे गेलेल्या गायरान जमिनींचा तपास करावा.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला व कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
स्थानिक शिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा.
खदान क्षेत्रातील गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी पाइपलाइन तातडीने स्थलांतरित करावी.
“निर्णय नाही, म्हणून अन्याय!”
“शासन व प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्याने शेतकरी, युवक व सामान्य नागरिकांवर अन्याय होतो आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आमरण उपोषण थांबणार नाही,” – विठोबा बोडे
पाठिंब्याची लाट
या आंदोलनाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, तालुका काँग्रेस अध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती शामजी रणदिवे, माजी उपसभापती संभा कोवे, माजी अध्यक्ष उमेश राजुरकर, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली. महिला, युवक, शेतकरी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या देत आहेत.
प्रशासन झोपेत की मुद्दाम मौन?
भर पावसातही उपोषण सुरू असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर संतापाचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ग्रामस्थांची मागणी सोपी आहे – न्याय मिळेपर्यंत आंदोलन पेटलेले राहील.
📢 सांगोडा ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे – “जमिनीचा अन्याय, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीविरोधात लढा अटळ आहे. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास परिणाम गंभीर भोगावे लागतील.”













