स्मशानभूमीजवळ पार्किंगच्या व्यवस्थेसह मोफत लाकडे पुरविण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी, चाळीसगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
चाळीसगाव शहरातील खरजईरोड हॉटेल दयानंद जवळील स्मशानभूमीलगत वाहनधारकांसाठी पार्किंगची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, तसेच अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडे (फुले) पालिका प्रशासनाकडून मोफत पुरवण्यात यावे यसह अन्य मागण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रामलाल चौधरी यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहराची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक असल्याने खरजई रोडवरील स्मशानभूमीजवळ वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाही. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी हा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून लावून धरला होता. त्याच अनुषंघाने दि.४ रोजी स्मशानभूमीच्या विविध समस्यांबाबत पुन्हा मुख्याधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी, अरुण पाटील, अनिल ठाकरे, पी.एन. पाटील, चेतन देशमुख आदींनी निवेदन दिले आहे. दरम्यान आमच्या मागणी संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था सोडविण्याचे आश्वासन आम्हाला दिले असून. लवकरच त्या ठिकाणी काँक्रिटीकरण केले जाईल व त्या भागात नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण असल्यास ते देखील काढून पालिकेच्या मोकळ्या जागेत नव्याने स्वतंत्र पार्किंगसाठी प्रयत्न केले जाईल, त्याचप्रमाणे अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडे (फुले) मोफत पुरविण्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचना घेऊन प्रयत्न केले जातील. यासंदर्भात पाचोरा नगरपालिका व अन्य ठिकाणाहून मार्गदर्शक घेतले जाईल असे त्यांनी सांगितले.
*१५ दिवसात काँक्रिटीकरण*
पंधरा दिवसापर्यंत स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोर काँक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न होईल. त्यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्यात सूचना दिल्या आहेत. त्या भागात जर अतिक्रमण असेल तर ते देखील काढले जाईल. व तेथील मोकळ्या जागेत नवीन पार्किंगची व्यवस्था करण्याचे प्रयत्न होतील. तसेच मोफत लाकडे (फुले) पुरवण्यासाठी मार्गदर्शक सूचना घेऊन प्रयत्न केले जातील.
*सौरभ जोशी*,
मुख्याधिकारी नगरपरिषद चाळीसगाव
पार्किंगसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार
स्मशानभूमीचे प्रवेशद्वारालगत तात्पुरते काँक्रिटीकरण अथवा परिसरात नव्याने पार्किंग व्यवस्था करावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार. तसेच अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडे (फुले) देखील पालिका प्रशासनाने मोफत पुरवावीत यासाठी देखील सातत्याने मागणी लावून धरली जाईल.
*रामलाल चौधरी,* सामाजिक कार्यकर्ते, चाळीसगाव













