जलतरण तलाव लवकरच शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाच्या सुशोभीकरण काम अंतिम टप्प्यात असून आज नगरपालिका मुख्याधिकारी, स्विमिंग असोसिएशनचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी कामाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या. जवळपास ३० वर्ष जुन्या या जलतरण तलावाची दुरावस्था झाल्याने जलतरण प्रेमींनी त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र चाळीसगाव शहराच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा हा ठेवा केवळ दुरुस्ती करून चालणार नाही तर त्याचे आजच्या काळाला साजेल असे नूतनीकरण करून देण्याचा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला होता. वर्षभरापूर्वी या जलतरण तलावाच्या कामासाठी ५ कोटी निधी मंजूर करून कामाचे भूमिपूजन केले होते. कामाची मुदत १२ महिने असून येत्या २० तारखेपर्यंत केवळ ७ महिन्याच्या विक्रमी वेळात हे काम पूर्ण होणार आहे. लवकरच अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त असा जलतरण तलाव शहरवासीयांच्या सेवेत दाखल होत असून जास्तीत जास्त जलतरणपटू व प्रेमींनी याचा लाभ घ्यावा तसेच हा जरी नगरपालिकेचा जलतरण तलाव असला तरी ती आपल्या घराचीच संपत्ती समजून त्याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.













