चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद दरम्यानच्या मुख्य रस्त्याला “डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव
( *चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव* )
महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल १४ मे रोजी सकाळी चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद दरम्यानच्या मुख्य रस्त्याला “डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले, आता हा रस्ता “डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी मार्ग” असा ओळखला जाईल. सदर नामकरण सोहळा हा आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काल 14 मे रोजी सकाळी पार पडला. या कार्यक्रमाला मनोगत व्यक्त करतांना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की आज जो रस्ता आपण त्यांच्या नावाने नामांकित करत आहोत, तो केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर तो विचारांचा, संस्कारांचा आणि सेवा-धर्माचा मार्ग आहे. पुढच्या पिढ्यांना हा मार्ग चालताना सतत आठवण होईल – की समाज बदलायचा असेल, तर विचार आणि कृती यांची सांगड घालावी लागते. लवकरच प्रवेशद्वाराचे लोकार्पण व नगरपालिकेत तैलचित्र अनावरणाचा यापेक्षा मोठा कार्यक्रम आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत ठेवण्याची माझी इच्छा आहे. यासाठी देखील आप्पा स्वारींची आज्ञा मिळेल व या शुभकार्याचे आपण सर्व साक्षीदार होऊ हा मला विश्वास त्यांनी व्यक्त केला, आज माझ्या आयुष्यातील हा ऐतिहासिक भावनिक असा क्षण आहे. खऱ्या अर्थाने धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात कोट्यवधी श्री सदस्यांना दासबोधाच्या निरूपणातून समाज प्रबोधन तसेच नीती मूल्यांची शिकवण दिली जात आहे. तसेच लहान बालकांना बाल संस्कारातून भक्तीचा मार्ग दाखविला जातो. यातून भावी पिढी घडविण्याचे उल्लेखनीय कार्य डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानत जगभरात राबवित असल्याच्या भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव घोडे, ईश्वर जाधव, नितीन पाटील संजय पाटील, दिलीप चौधरी, पवार गुरुजी, उद्धवराव महाजन, राजेंद्र चौधरी, राजेंद्र राठोड, आनंद खरात, के.बी.साळुंखे, प्रभाकर चौधरी, मुकेश चौधरी, कपिल पाटील, विवेक चौधरी, पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक राहुल पवार, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी नगरसेवक तसेच श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले.









