राजाळे येथे अवैध दारू विक्रीवर फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; दोन महिलांवर गुन्हे दाखल
फलटण .प्रतिनिधी
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे राजाळे येथे अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण १,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजाळे गावच्या हद्दीत काही महिला बेकायदेशीररीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असता, दोन महिला त्यांच्या राहत्या घराच्या आडोशाला उघड्यावर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारूची विक्री करताना आढळून आल्या.
या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन्ही महिलांकडून प्रत्येकी १० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये असलेली सुमारे ५०० रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. असा एकूण १,००० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, जप्त केलेल्या दारूचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६६५/२०२६ व ६६६/२०२६ अन्वये दोन्ही महिलांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही यशस्वी कारवाई महिला पोलीस हवालदार वैभवी प्रमोद भोसले आणि पोलीस हवालदार वावरे यांनी पार पाडली. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.












