माऊलींचा टिळा लावून अंधाराचा कारभार? पालखी महामार्गावरील तीनही उड्डाणपूल ‘मृत्यूचे सापळे’; प्रशासन मोठ्या बळीची वाट पाहतंय का?
निंभोरे, सुरवडी आणि तरडगाव येथील उड्डाणपूल वर्षभरापासून काळोखात; कराडच्या भीषण अपघातानंतरही ‘एनएचएआय’ची कुंभकर्णी झोप उडेना
फलटण (प्रतिनिधी)
कोटी-कोटी रुपये खर्चून उभारलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर सध्या सुशोभीकरणाचा दिखावा आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक चित्र आहे. फलटण तालुक्यातील निंभोरे, सुरवडी आणि तरडगाव या तीनही महत्त्वाच्या उड्डाणपुलांवर वाहतुकीला सुरुवात होऊन तब्बल वर्ष उलटले, तरीही या पुलांवरील एकही पथदिवा अद्याप पेटलेला नाही. खांबांवर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र टिळ्याची प्रतिकृती लावून भक्तीचा देखावा करायचा आणि खाली प्रवाशांना काळोखाच्या खाईत लोटायचे, हा नेमका कोणता कारभार आहे? नुकत्याच कराड येथील उड्डाणपुलावर अंधारामुळे चार निष्पाप तरुणांचा बळी गेला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असताना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित प्रशासन मात्र फलटणमध्येही अशाच मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
सुशोभीकरणाचा झगमगाट, पण सुरक्षिततेचा बट्ट्याबोळ
या तीनही उड्डाणपुलांवर आणि सेवा रस्त्यांवर आधुनिक दिव्यांचे खांब उभारले गेले आहेत. दिवसा हे खांब माऊलींच्या टिळ्यामुळे आकर्षक दिसतात, पण सायंकाळ होताच हेच खांब प्रवाशांसाठी काळ बनून उभे राहतात. “जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेले हे दिवे केवळ शोभेसाठी आहेत का? सुशोभीकरणावर कोट्यवधींची उधळपट्टी करणाऱ्या प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिवे सुरू करायला कोणता मुहूर्त हवा आहे?” असा तिखट सवाल वाहनचालक करत आहेत.
रात्रीचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून केलेली कसरत
पालखी महामार्गावर रात्रंदिवस अवजड वाहने आणि दुचाकींची मोठी वर्दळ असते. तीनही उड्डाणपुलांवर मिट्ट काळोख असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर हेडलाईटमुळे चालकांचे डोळे दिपतात. या अंधारात रस्त्यावरील अडथळे, बंद पडलेली वाहने किंवा दुचाकीस्वार दिसत नसल्याने क्षणाक्षणाला अपघाताची टांगती तलवार डोक्यावर असते. एखाद्या निष्पाप कुटुंबाचा संसार उघड्यावर पडल्यावरच अधिकाऱ्यांना जाग येणार का, असा रोखठोक जाब नागरिक विचारत आहेत.
दोन यंत्रणांच्या वादात प्रवाशांचा जीव टांगणीला
एक नव्हे, तर तब्बल तीन उड्डाणपुलांवरील दिवे वर्षभर बंद राहणे, हा निव्वळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस आहे. महामार्ग प्राधिकरण आणि महावितरण यांच्यातील समन्वयाचा अभाव की रखडलेली वीजजोडणी, याचे उत्तर अधिकाऱ्यांनी तात्काळ द्यावे. जनतेचा पैसा पाण्यात घालवणाऱ्या या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे.
अन्यथा महामार्ग रोखून धरू; ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा
कराडच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती फलटण तालुक्यात होऊ द्यायची नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ निंभोरे, सुरवडी आणि तरडगाव उड्डाणपुलांची पाहणी करून पथदिवे सुरू करावेत. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास आणि हा अंधार दूर न केल्यास, तीनही गावांतील ग्रामस्थ आणि वाहनचालक रस्त्यावर उतरून महामार्ग रोखून आंदोलन करतील, असा खणखणीत इशारा देण्यात आला आहे.












