फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉनचे १३ डिसेंबरला आयोजन
पर्व दुसरे : ५, १० व २१ किलोमीटरच्या स्पर्धा; विजेत्यांना १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपयांची पारितोषिके
दुधेबावी, ता. १७ : फलटण रनर्स फाउंडेशनच्या वतीने ‘फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉन २०२६’ पर्व दुसरेचे आयोजन रविवार, दि. १३ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. फलटण शहरातील सजाई गार्डन ते गिरवी रोड या मार्गावर ही स्पर्धा होणार असून, ५ किलोमीटर (फन रन), १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांत धावपटूंना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे.
फलटण शहराचा ऐतिहासिक वारसा समाजासमोर आणणे, नागरिकांमध्ये व्यायामाचे महत्त्व रुजविणे आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करणे हा या मॅरेथॉन आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. ५ किलोमीटरची फन रन खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. तर १० व २१ किलोमीटरच्या स्पर्धांसाठी १८ ते ३४ वर्षे, ३५ ते ४९ वर्षे आणि ५० वर्षे व त्यापुढील असे वयोगट निश्चित करण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बक्षीस व्यवस्था करण्यात आली आहे.
१० व २१ किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या धावपटूंना अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये रोख पारितोषिकांसह मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला सहभागाचे मेडल आणि टी-शर्ट, बॅग व बिब असलेले वेलकम किट देण्यात येणार आहे.
फलटण शहरासह विविध भागांतील धावपटूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश द्यावा, असे आवाहन फलटण रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शिंदे यांनी केले आहे.
यावेळी नानासाहेब काळुखे, प्रवीण घोरपडे, सौ. अनुजा त्रिपुटे, अमित माने, डॉ. चंद्रकांत जगदाळे, चंद्रकांत सापते, अभिजीत शेंडे, पराग मासाळ यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.












