बनावट मूल्यांकन दाखला प्रकरणी आठ जमीनधारकांविरुद्ध गुन्हा दाखल
कोळकी येथील गट नं. ७९/१/१, ७९/१/५ व ८०/१ प्रकरण; तिघांना अटक, पाच संशयित फरार
फलटण | एव्हीबी माझा प्रतिनिधी :
कोळकी, ता. फलटण येथील गट नं. ७९/१/१, ७९/१/५ व ८०/१ या जमिनी भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आठ जमीनधारकांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी रणधीर धनसिंगराव भोईटे, निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि विरेंद्र विक्रम झांजुर्णे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी निवासी नायब तहसीलदार अभिजित अशोक सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये सोनवणे यांना गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते.
३५ लाखांच्या मूल्यांकनावरून सुरू झाला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, रणधीर धनसिंगराव भोईटे यांनी दि. ११ जून २०२५ रोजी कोळकी येथील संबंधित जमिनी भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जासोबत सहायक दुय्यम निबंधक वर्ग-२, फलटण यांच्या कार्यालयाचा शिक्का असलेला दि. १९ जून २०२५ रोजीचा मूल्यांकन दाखला सादर करण्यात आला होता.
या दाखल्याच्या आधारे संबंधित जमिनींचे एकूण मूल्यांकन ३५ लाख १ हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. त्याच्या ५० टक्के रकमेप्रमाणे १७ लाख ५१ हजार रुपये नजराणा अर्जदाराने दि. २३ जून २०२५ रोजी शासकीय तिजोरीत जमा केला. त्यानंतर दि. २६ जून २०२५ रोजी संबंधित जमीन भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्याचा आदेश तहसील कार्यालयाकडून पारित करण्यात आला.
मूल्यांकन दाखला बनावट असल्याची तक्रार
दरम्यान, दि. २९ जुलै २०२५ रोजी एका तक्रारदाराने संबंधित मूल्यांकन दाखला बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. त्यानंतर सहायक दुय्यम निबंधक वर्ग-२, फलटण क्र. २ यांनी दि. २५ जुलै २०२५ रोजीच्या पत्राद्वारे दि. १९ जून २०२५ रोजीचा मूल्यांकन दाखला बनावट असल्याचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर तहसील कार्यालयाने रणधीर भोईटे व इतर संबंधितांना नोटिसा बजावून त्यांचे लेखी खुलासे घेतले. नव्याने करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार गट नं. ७९/१/१ व ७९/१/५ या क्षेत्राचे मूल्यांकन ४३ लाख ३३ हजार रुपये, तर गट नं. ८०/१ पैकी क्षेत्राचे मूल्यांकन ३३ लाख २६ हजार रुपये, असे एकूण ७६ लाख ५९ हजार रुपये निश्चित करण्यात आले.
नजराणा रक्कम वाढली
नव्या मूल्यांकनाच्या ५० टक्के रकमेप्रमाणे ३८ लाख २९ हजार ५०० रुपये नजराणा रक्कम निश्चित झाली. त्यापैकी उर्वरित २० लाख ८० हजार रुपये दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रणधीर भोईटे यांच्याकडून शासकीय तिजोरीत जमा करून घेण्यात आले. त्यानंतर दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी संबंधित गटांबाबत दुरुस्त आदेश पारित करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात शासनाच्या महसुलाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी, सातारा यांनी दि. १३ एप्रिल २०२६ रोजीच्या पत्रान्वये एका तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढला होता.
मात्र, दि. १५ जून २०२६ रोजी दुसऱ्या तक्रारदाराने स्वतंत्र अर्ज करून बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
तिघांना अटक; पाच संशयित फरार
तहसीलदारांच्या प्राधिकृत आदेशानंतर निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रणधीर धनसिंगराव भोईटे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि राजेंद्र सदाशिव कापसे यांना अटक केली आहे.
तर निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे आणि विरेंद्र विक्रम झांजुर्णे हे पाच संशयित फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मूल्यांकन दाखला कोणी तयार केला? पोलिस तपासातून उलगडा होणार
या प्रकरणातील बनावट मूल्यांकन दाखला नेमका कोणी तयार केला, तो कसा तयार करण्यात आला, त्यावर कार्यालयीन शिक्का व कागदपत्रांचा वापर कशाप्रकारे झाला आणि तो तहसील कार्यालयात कोणत्या माध्यमातून सादर करण्यात आला, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
एव्हीबी माझा | सत्य • निर्भीड • निष्पक्ष
संपादक : श्री. विजय भिसे












