डॉ. चेतना कोतकर यांना बेस्ट सेक्रेटरी पुरस्कार प्रदान
चाळीसगाव प्रतिनिधी :-
येथील इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी व शहरातील प्रसिद्ध असलेल्या आई हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. चेतना कोतकर यांना नाशिक येथे झालेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३च्या वार्षिक संमेलनात बेस्ट सेक्रेटरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डिस्ट्रिक्ट चेअरमन व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कोतकर यांनी वर्षभर सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन तसेच महिलांच्या आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत डिस्ट्रिक्ट स्तरावरील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमास चाळीसगाव इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा जुलेखा शुक्ला यांच्यासह नीता सामंत, वनमाला राठोड, नंदा पवार आदी पदाधिकारी व सदस्य महिला उपस्थित होत्या. डॉ. कोतकर यांच्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.












