
नंदुरबार तालुक्यात तरुणाकडून तलवार जप्त; तालुका पोलिसांची धडक कारवाई
नंदुरबार – नंदुरबार तालुका पोलिसांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणावर कारवाई करत त्याच्याकडून स्टीलची तलवार व मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणी आर्म अॅक्ट 1958 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,* दि. 21 मार्च रोजी दुपारी सुमारे 12.10 वाजण्याच्या सुमारास खामगाव गावाजवळील नदीच्या पुलाजवळ गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद हालचाल करत असलेल्या मोटारसायकलस्वाराला थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे तलवार आढळून आली.
तपासात लखन वासू वळवी (वय 22, रा. विरचक, ता. नंदुरबार) याच्याकडून लाल रंगाच्या कापडी म्यानमध्ये ठेवलेली सुमारे 72 सेंमी लांबीची स्टीलची तलवार जप्त करण्यात आली. तसेच त्याच्याकडील हिरो स्प्लेंडर प्लस (MH-39-AK-1383) ही मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत सुमारे 50,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट 1958 चे कलम 4, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) व 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार विनायक सोनवणे यांनी तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार रमेश कडवे करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुका प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी गस्त अधिक तीव्र करत कडक नजर ठेवली होती.
त्या अनुषंगाने नंदुरबार तालुका अंमलदार पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दुसरी महत्त्वपूर्ण कारवाई करत आपली सतर्कता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.













