एम.पी.एस.सी. पेपर साठी 45 लाखांची मागणी करणारे पोलिसांच्या अटकेत
पुणे प्रतिनिधी; परीक्षार्थींना कॉल करून पेपर लीक करत असल्याचा दावा करीत गट ब साठी 45 लाख व गट क साठी 35 लाख रुपयांची मागणी करणारा कॉल व मेसेज केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी एका खाजगी अभियांत्रिकी कंपनीतील दोन तंत्रज्ञांना आणि त्यांच्या हँडलरला नागपूर येथून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर; पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दाखल केली होती. आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही परीक्षेचा पेपर लीक झाला आहे आणि तो 45 लाख रुपयांना उपलब्ध असा दावा करणारा परीक्षार्थी यांचा फोन आला होता. त्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती. पण त्या दाव्यात तथ्य नाही. असे पोलिसांनी सांगितले आहे.
याप्रकरणी दीपक दयाराम गायधने वय 26 वर्षेआणि सुमित कैलास जाधव वय 23 वर्षे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले सोबतच नागपूर पोलिसांच्या मदतीने हँडलर योगेश वाघमारे वय 28 वर्ष याला नागपूर मध्ये अटक करण्यात आली आहे.
गायधने आणि जाधव एका अभियांत्रिकी कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होते.
एका कन्सल्टन्सी फॉर्म च्या नावाखाली लाखो रुपयांच्या मोबदल्यात परीक्षा पेपर देण्याचे आश्वासन संबंधितांनी केले होते. गायधने आणि जाधव यांच्या फोनमध्ये 25 एमपीएससी इच्छुकांची यादी मिळाली आहे. ती यादी त्यांना कोणत्या कोचिंग सेंटर मधून मिळाली असावी? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सोबतच आयटीआय ट्रेडमन वाघमारे याच्याशी गायधने आणि जाधव याचा संपर्क कसा झाला? याबाबत पोलिसांना कळालेले नाही. यापुढे पोलीस अटक केलेल्या तिघांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहेत.
त्यांना यासाठी कोणी पैसे ट्रान्सफर केले आहेत का? याचा तपास होणार आहे.
तिघांपैकी कोणीच एमपीएससीच्या परीक्षेला बसलेले नाही.यांनी संपर्क केल्यानंतर परीक्षार्थींनी यांना फोन करून पैशांची देवाणघेवाण केली आहे का? याबाबत सुद्धा तपास होणार आहे. सोबतच पेपर खरंच लीक झाला होता का? याबाबतही पोलीस तपास करणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे.











