हिट अँड रन अपघातात महिला ठार; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल
फलटण प्रतिनिधी
फलटण ते पुसेगाव मार्गावर झालेल्या भीषण हिट अँड रनच्या अपघातात एका २७ वर्षीय महिला उपचारादरम्यान मयत झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चार चाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की,
दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास मौजे वाठार निंबाळकर (ता. फलटण) हद्दीतील फलटण-पुसेगाव रोडवरील सुनील कुंभार यांच्या वीटभट्टीजवळ हा अपघात घडला. फिर्यादीचे नातेवाईक अमर धोंडीराम चव्हाण हे त्यांची मोटारसायकल (क्र. MH 11 / CV 3235) वरून आपली पत्नी सौ. सुचिता आणि मुली कु. आरोही व कु. आराध्या यांना घेऊन जात होते. यादरम्यान पुसेगाव बाजूकडून येणाऱ्या एका अज्ञात चार चाकी वाहनाच्या चालकाने आपले वाहन रॉंग साईडने, हयगईने व भरधाव वेगात चालवून चव्हाण यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलवरील अमर धोंडीराम चव्हाण, सौ. सुचिता अमर चव्हाण (वय २७), कु. आरोही अमर चव्हाण आणि कु. आराध्या अमर चव्हाण हे गंभीर व किरकोळ जखमी झाले. मात्र, अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता किंवा पोलिसांना खबर न देता घटनास्थळावरून पळ काढला.
अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी झालेल्या सौ. सुचिता अमर चव्हाण या उपचारादरम्यान पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये मयत झाल्या.
याप्रकरणी श्री. महेंद्र भगवान पुंडेकर (वय ३५, रा. वाठार निंबाळकर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चार चाकी वाहन चालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०६, १२५(अ), १२५(ब), २८१ सह मोटार वाहन अधिनियम कलम १३४(ए), १३४(बी), १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि पवार हे करीत आहेत. अपघातातील अज्ञात चार चाकी वाहनाचा व चालकाचा शोध घेतला जात असून, घटनेबाबत कोणालाही काही महत्त्वाची माहिती असल्यास त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक:
* एपीआय प्रशांत सुबनावळ: ८६०५०४२७७७
* पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार: ९८५१९१५१५१
* फलटण ग्रामीण पोलीस ठाणे: ०२१६६-२२२५३३













