जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रामभाऊ ढेकळेंची पत्नी कांताबाईंसाठी फिल्डिंग!
मकरंद आबा पाटलांकडे उमेदवारीचे साकडे; NT-C की मजूर संस्था प्रवर्गातून संधी मिळणार?
एव्हीबी माझा | फलटण
फलटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणच्या राजकीय वर्तुळात आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांनी आपल्या पत्नी कांताबाई रामभाऊ ढेकळे यांच्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालकपदाची उमेदवारी मिळावी, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे केली आहे. विमुक्त भटक्या जाती-जमाती (NT-C) अथवा मजूर संस्था या दोन प्रवर्गांपैकी एका जागेवर उमेदवारी मिळावी, अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रामभाऊ ढेकळेंचा अनुभव; पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न
रामभाऊ ढेकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून फलटण तालुका उपाध्यक्ष म्हणून सलग १५ वर्षे काम केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यानंतर सातारा जिल्हा कमिटीमध्येही त्यांनी काम केले. पक्षाचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी सोपविल्याचा उल्लेख करत, पक्षासाठी केलेल्या कार्याचा आणि निष्ठेचा विचार करून आपल्या पत्नी कांताबाई ढेकळे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागील निवडणुकीतील अनुभवाचा दाखला
मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी आपली उमेदवारी निश्चित झाली होती; मात्र पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ऐनवेळी अर्ज मागे घ्यावा लागला, असे रामभाऊ ढेकळे यांनी निवेदनात म्हटले आहे. पक्षाचा निर्णय मान्य करून माघार घेतल्याचे सांगत, आता आपल्या दीर्घ राजकीय अनुभवाचा आणि पक्षासाठी केलेल्या योगदानाचा विचार करून पत्नीला संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
धनगर समाजाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा ऐरणीवर
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, हा मुद्दाही निवेदनातून पुढे आला आहे. फलटण, माण, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, कराड, सातारा आणि पाटण या भागांमध्ये धनगर समाजाचे लक्षणीय मतदान असूनही समाजाला जिल्हा बँकेत पुरेशी संधी मिळाली नसल्याची भूमिका ढेकळे यांनी मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर कांताबाई रामभाऊ ढेकळे यांना NT-C अथवा मजूर संस्था या दोन प्रवर्गांपैकी एका जागेवर उमेदवारी देण्यासाठी मंत्री मकरंद आबा पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कांताबाई ढेकळेंच्या उमेदवारीबाबत पक्ष काय निर्णय घेणार?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी आणि प्रवर्गनिहाय प्रतिनिधित्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असताना रामभाऊ ढेकळे यांनी पत्नीच्या उमेदवारीसाठी केलेली मागणी राजकीय चर्चेचा विषय ठरू शकते. कांताबाई ढेकळे यांच्या नावाचा पक्षाकडून विचार होणार का, त्यांना कोणत्या प्रवर्गातून संधी मिळणार आणि मंत्री मकरंद आबा पाटील यांची भूमिका काय असणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
रामभाऊ ढेकळेंची पत्नी कांताबाईंसाठी उमेदवारीची मागणी; पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे पक्षाच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होतील.













