चाळीसगाव तालुक्यात MRGS योजनेतील विकासकामांच्या चौकशीची मागणी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
चाळीसगाव तालुक्यात जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत MRGS योजनेतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार कल्पेश महाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती करिष्मा नायर यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये MRGS योजनेअंतर्गत गावांतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, गोठा शेड, शेततळे आणि सिंचन विहिरी यांसारखी विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी कामे प्रत्यक्षात अपूर्ण असल्याचे, तर काही गावांमध्ये कामे झालेली नसतानाही संबंधित कामांची बिले काढण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या तक्रारीसोबत संबंधित ग्रामपंचायतींची नावे, कामांचे कोड आणि कामांसाठी काढण्यात आलेल्या बिलांच्या रकमेची सविस्तर माहिती जोडण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. संबंधित कामांची कागदोपत्री माहिती तपासण्याबरोबरच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामांची गुणवत्ता, पूर्णत्वाची स्थिती आणि बिलांच्या रकमेची पडताळणी करण्यात यावी. चौकशीत अनियमितता अथवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा इतर दोषींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देणार का? संबंधित विकासकामांची प्रत्यक्ष तपासणी होऊन वस्तुस्थिती समोर येणार का? याकडे चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.













