आनंदीबाई बंकट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली १.५ टन क्षमतेच्या ई-वाहनाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
आनंदीबाई बंकट हायस्कूलच्या तांत्रिक विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने तयार केलेले १.५ टन क्षमतेच्या ई-वाहनाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर मान्यवरांनी ई-वाहनाची प्रत्यक्ष पाहणी करून ते चालवून पाहिले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे ई-वाहन सुमारे १.५ टन भार वाहून नेण्यास सक्षम असून त्याच्या अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला मिळालेल्या या यशामुळे विद्यालयाच्या तांत्रिक शिक्षणाला नवी ओळख प्राप्त झाली आहे. या अभिनव प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांच्या कल्पकता, जिद्द आणि तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांच्या प्रेरणेतून तसेच व्हाइस चेअरमन व आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलचे चेअरमन योगेशभाऊ अग्रवाल यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची कल्पकता, जिद्द आणि तांत्रिक जाण यांचा संगम असलेले हे ई-वाहन उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार आनंदीबाई बंकट मुलींच्या हायस्कूलचे चेअरमन ॲड. प्रदीप अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आला, तर उद्घाटक आमदार अनुप भैया अग्रवाल यांचा सत्कार आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलचे चेअरमन योगेशभाऊ अग्रवाल यांनी केला. या प्रकल्पासाठी मार्गदर्शक शिक्षक कल्पेश कासार व चेतन कुऱ्हाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पात शंतनू अनिल महाजन, ओम नितीन मोरे, मंदार नरेंद्र बोरसे, विशाल संतोष पाटील, लोकेश सुरेश सुतार, रितेश अमित वर्मा, ऋषिकेश सुनील शिंगटे, खुशांत प्रमोद बाविस्कर, सिद्धांत अनिल निकम आणि सार्थक प्रशांत महाले या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण, उद्घाटक आमदार अनुप भैया अग्रवाल, आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलचे चेअरमन योगेशभाऊ अग्रवाल, आनंदीबाई बंकट मुलींच्या हायस्कूलचे चेअरमन ॲड. प्रदीप अहिरराव, संस्थेचे अध्यक्ष आर. सी. पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, मुख्याध्यापक महेंद्र कुमावत, उपमुख्याध्यापक प्रशांत नेरकर, पर्यवेक्षिका सुनीता कासार, पर्यवेक्षक प्रवीण राजपूत, शिक्षक प्रतिनिधी दत्तूनाना सावळे, शिक्षकेतर प्रतिनिधी निरंजन लद्दे, संचालक मंडळाचे सदस्य, विविध विद्यालयांचे चेअरमन, विश्वस्त, समिती सदस्य, आजी-माजी नगरसेवक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता सोमाणी व किशोर शिरुडे यांनी केले तर आभार प्रदीप अहिरराव यांनी मानले.













