बुलढाण्याच्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा गोद्री ‘ढालकी’ धार धबधब्यावरून दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू
प्रतिनिधी बाळू वाघ
फत्तेपूर (ता. जामनेर): जामनेर तालुक्यातील फत्तेपूरजवळील प्रसिद्ध ‘ढालकी धबधबा’ येथे मंगळवारी (४ ऑगस्ट) एक अतिशय दुःखद घटना घडली. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा धबधब्यावरून पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. आकाश सुनील पडघान (वय २५, रा. भादोला, जि. बुलढाणा) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. आकाश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
पावसाळी पर्यटनाचा आनंद ठरला घातकी
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आकाश पडघान हा महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी तो आपल्या ५ ते ६ मित्रांसोबत गोदरी येथील प्रसिद्ध ढालकी धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सर्व मित्र धबधब्याजवळ पोहण्याचा आणि निसर्गाचा आनंद घेत होते. त्यावेळी अचानक आकाशचा पाय घसरला आणि तो थेट उंचावरून खोल दरीत कोसळला.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
दरीत कोसळल्यामुळे आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच बेशुद्ध झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून मित्रांनी आणि वनविभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव येथे पोहोचले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
परिसरात हळहळ; कुटुंबावर शोककळा
आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याची बातमी कळताच भादोला (जि. बुलढाणा) गावासह फत्तेपूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.










