🛑 एव्हीबी माझा | विशेष बातमी
फलटण पालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाच सदस्यीय चौकशी समितीची स्थापना; मुख्याधिकाऱ्यांच्याही भूमिकेची होणार तपासणी?
फलटण | प्रतिनिधी
फलटण नगर परिषदेच्या कर विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी पाच सदस्यीय जिल्हास्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात यापूर्वी प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नियोजित कालावधीत अहवाल सादर न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जिल्हास्तरीय समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या समितीकडून कर विभागातील व्यवहार, महसूल नोंदी, आर्थिक कागदपत्रे, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी तसेच प्रशासकीय प्रक्रियेची तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून, अहवालातील निष्कर्षांच्या आधारे पुढील प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.
या प्रकरणाकडे फलटण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, चौकशीतून नेमके सत्य समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
— विजय भिसे
संपादक, एव्हीबी माझा













