भारतीय पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. विकास शिंदे यांची नियुक्ती : पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना बळकटीचा निर्धार

भारतीय पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. विकास शिंदे यांची नियुक्ती : पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना बळकटीचा निर्धार

 

फलटण, प्रतिनिधी : पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या मूल्यांच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट (AIJ) – भारतीय पत्रकार संघ यांच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा प्रा. विकास सुरेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना सक्षम नेतृत्व लाभले असून पत्रकार क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एम. एस. शेख, लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष ॲड. कैलास पठारे तसेच प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष एस. बी. नदाफ यांनी दि. ७ जून २०२६ रोजी नियुक्तीपत्र जारी करून ही घोषणा केली.

 

प्रा. विकास शिंदे हे पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रसारमाध्यमांतून प्रभावीपणे मांडण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. लोकमतसारख्या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेशी संलग्न राहून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.

 

नियुक्तीपत्रानुसार त्यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ७ जून २०२६ ते ६ जून २०२८ या कालावधीसाठी करण्यात आली असून संघटनेच्या उद्दिष्टांनुसार पत्रकार हितासाठी कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करणे, त्यांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविणे, पत्रकार संरक्षण व कल्याणाच्या योजनांसाठी प्रयत्न करणे तसेच पत्रकारितेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना प्रा. विकास शिंदे यांनी भारतीय पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. “संघटनेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराला संघटनेशी जोडून त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यास प्राधान्य देईन. पत्रकारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या व्यावसायिक विकासासाठीही प्रयत्नशील राहीन,” असे त्यांनी सांगितले.

 

प्रा. विकास शिंदे यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील पत्रकार चळवळीला नवी दिशा मिळणार असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास पत्रकार बांधवांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध पत्रकार संघटना, सामाजिक संस्था, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें