पंचायत समिती खंडाळा येथे GPDP–BPDP आराखड्यांवर दोन सत्रांत प्रशिक्षण कार्यशाळा
संपन्न SDG, HD थीम व लोकाभिमुख शाश्वत विकास आराखड्यांवर भर.
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) व पंचायत समिती विकास आराखडा (BPDP/PSDP) सन २०२६–२७ अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत पद्धतीने तयार करण्याच्या दृष्टीने पंचायत समिती खंडाळा यांच्या वतीने आज दिनांक १6 डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती खंडाळा येथील किसनवीर स्मारक सभागृहात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दोन सत्रांमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत माननीय गटविकास अधिकारी श्री. अनिल वाघमारे यांनी सखोल व मार्गदर्शक स्वरूपाचे भाषण केले. त्यांनी GPDP व BPDP आराखडे हे केवळ वार्षिक औपचारिक दस्तऐवज नसून ग्रामपातळीपासून तालुकास्तरापर्यंत सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारे मूलभूत नियोजन साधन असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक गरजांवर आधारित, लोकसहभागातून व पारदर्शक पद्धतीने तयार होणारे आराखडे हेच प्रभावी विकासाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले.
मार्गदर्शनात शाश्वत विकास ध्येय (SDG) व मानवी विकास (HD – Human Development) थीम यांचा GPDP व BPDP आराखड्यांत समावेश करण्यावर विशेष भर देण्यात आला. दारिद्र्य निर्मूलन, उपजीविका व रोजगार वाढ, आरोग्य व पोषण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ पाणी व स्वच्छता, महिला व बालकल्याण, सामाजिक समावेशन, पर्यावरण संरक्षण व हवामान बदलाशी सुसंगत विकास या SDG शी निगडित उद्दिष्टांचा थेट संबंध आराखड्यांशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. HD थीम अंतर्गत आरोग्य, शिक्षण व जीवनमान उंचावणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देऊन मानवी विकास निर्देशांक वाढविण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यशाळेत GPDP संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. GPDP हा ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांच्या गरजांवर आधारित तयार होणारा सर्वसमावेशक विकास आराखडा असून तो गावाच्या आर्थिक, सामाजिक, भौतिक व पर्यावरणीय विकासाचा पाया असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ग्रामसभेतून समस्या व गरजांची ओळख, प्राधान्यक्रम निश्चिती, उपलब्ध संसाधनांचे मूल्यांकन, खर्चाचा अंदाज, कालबद्ध कृती आराखडा आणि सातत्यपूर्ण आढावा या टप्प्यांचा GPDP मध्ये समावेश असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
आराखडे तयार करताना १५ वे वित्त आयोग, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, जिल्हा वार्षिक योजना, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे स्वनिधी, CSR, लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था, तसेच विविध विभागीय योजनांमधील निधी यांचा योग्य समन्वय साधून निधी उभारणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व निधी स्रोतांचा अभिसरणातून उपयोग केल्यास लोकाभिमुख, गरजाधारित व शाश्वत विकासाचे आराखडे प्रत्यक्षात उतरू शकतील, असे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात GPDP व BPDP आराखड्यांचे महत्त्व, उद्दिष्टे, SDG–HD थीम व सैद्धांतिक बाबी स्पष्ट करण्यात आल्या, तर दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष नियोजन, निधी स्रोतांची ओळख, प्राधान्यक्रम ठरवणे, डेटा-आधारित नियोजन, तांत्रिक अचूकता, कालबद्ध अंमलबजावणी व नियमित आढावा यावर भर देण्यात आला.
या प्रशिक्षणासाठी प्रवीण प्रशिक्षक श्री. प्रकाशकुमार बोंबले, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सनील बोडरे, विस्तार अधिकारी श्री. महादेव चौधरी, श्री. अधिकराव नरुटे सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून आराखडे तयार करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय व उत्तम कार्यपद्धती स्पष्ट केल्या. कार्यशाळेचे नियोजन व यशस्वी आयोजन पंचायत समिती खंडाळा प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे करण्यात आले.
कार्यशाळेत उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. SDG, HD थीम व विविध निधी स्रोतांच्या समन्वयातून तयार होणारे आराखडे अधिक स्पष्ट, निधी-सुसंगत, अंमलबजावणीयोग्य व लोकाभिमुख ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. प्रश्नोत्तर सत्राद्वारे उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
ही प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समिती खंडाळा विकास गटातील ग्रामपंचायतींची नियोजन क्षमता वाढवून गावपातळीपासून तालुकास्तरापर्यंत शाश्वत, सर्वसमावेशक व मानवी विकासाभिमुख विकास साधण्याच्या दिशेने महत्त्वाची ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.













