नागठाणे भाग पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रमोद पंचपोर यांची निवड
वजनदार नेतृत्वाखाली पारदर्शकतेचा संकल्प
नागठाणे प्रतिनिधी : नागठाणे भाग पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकत्याच झालेल्या बैठकीत उत्साहात पार पडली. या निवड प्रक्रियेत प्रभावी पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सातारा जिल्हा सल्लागार प्रमोद पंचपोर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी ‘दै. प्रभात’चे विजय घोरपडे, तर सचिवपदी संदीप जाधव यांची निवड झाली. तसेच ज्येष्ठ पत्रकार पां. प. पवार यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली.
संघाच्या सल्लागार समितीत दै. ‘सकाळ’चे पत्रकार सुनील शेडगे, विजय अलाटे, सतीश जाधव, धनंजय माने, सूर्यकांत पवार यांचा समावेश आहे.
या निवड सभेला मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्ता घाडगे, माजी अध्यक्ष धनाजी कणसे, ‘सकाळ’चे विकास जाधव, सतीश जाधव, प्रताप भोसले, अविनाश कारंडे, किरण पवार, मधुकर कणसे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नव्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी मावळते अध्यक्ष धनाजी कणसे यांनी त्यांच्या कार्यकाळातील उपक्रमांची माहिती दिली.
नव्या नेतृत्वाखाली संघटनेत सुरू असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांना गती देणे, पत्रकारांच्या समस्यांवर ठोस भूमिका घेणे आणि कारभार पारदर्शक व लोकाभिमुख ठेवण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.













