मातृशक्तीचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी : विश्व हिंदू परिषद
साताऱ्यातील पोवई नाका येथे विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती, बजरंग दल आणि विविध हिंदू संघटनांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
या आंदोलनादरम्यान संघटनांनी सांगितले की, बिहारमधील दरभंगा येथे काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. भारतीय संस्कृतीत मातेला सर्वोच्च स्थान असून अशा प्रकारची विधाने निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय गाढवे, दुर्गा वाहिनीच्या जिल्हा अध्यक्षा अस्मिता लाड, प्रचार प्रमुख प्रमोद मोरे, मातृशक्तीच्या शहर अध्यक्षा सुवर्णा पाटील, उपाध्यक्षा सीता चव्हाण, बजरंग दलाचे दादासाहेब राजेशिर्के, विश्व हिंदू परिषदेच्या सीमा गायकवाड, तसेच भारतीय जनता पार्टीचे विकास गोसावी, रवी आपटे, विकास बनकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.











