गट-क अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षासूची व उपलब्ध रिक्त पदांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
हरकती असल्यास 27 ऑगस्ट पर्यंत कळविण्याचे आवाहन
सातारा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि.17 जुलै 2025 अनुकंपा नियुक्ती बाबतचे सुधारीत धोरण निश्चीत करण्यात आले आहे. तसेच परिपत्रक दि.17 जूलै 2025 अन्वये मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देणेबाबत अंदाजित वेळापत्रकानुसार कार्यवाही करणेच्या सुचना दिलेल्या आहेत. या परिपत्रकातील टप्पा क्र.4 नुसार जिल्हाधिकारी सातारा यांचे मार्फत जिल्हास्तरीय गट-क अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षासूची (परिशिष्ट-इ) आणि अनुकंपा नियुक्तीसाठी गट-क संवर्गातील उपलब्ध रिक्त पदांची यादी (परिशिष्ट-फ) प्राथमिकरित्या आदेश क्र.मह/2/आस्था/1/Comp No.2098710 दि.25/08/2025 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. सदर याद्या जिल्हयातील सर्व नियुक्ती प्राधिकारी व कार्यालयांना ईमेलद्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत. सदरची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.satara.gov.in/en/ वर Whats New या भागामध्ये दि.25 ऑगस्ट रोजीच प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी जिल्हयातील सर्व अनुकंपा गट-क यादीवरील उमेदवार व जिल्हयातील नियुक्ती प्राधिकारी कार्यालये व कार्यालय प्रमुख यांनी अवलोकन करुन दि.27 ऑगस्ट 2025 पूर्वी त्यांच्या काही हरकती व सूचना असल्यास पुराव्याच्या कागदपत्रांसह सादर करणे बाबत आदेशान्वये सूचीत केले आहे. दि.27 ऑगस्ट 2025 नंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही याची सर्व अनुकंपा उमेदवार, जिल्हयातील नियुक्ती प्राधिकारी व कार्यालय प्रमुख यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे.











