घरकुल लाभार्थ्यांचा लढा यशस्वी: पहिल्या टप्प्यात 200 जणांना वाळूचे पास
श्री. स्वप्निल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला यश
वाई, दि. 15 मे 2025: मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी या मागणीसाठीच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. वाईचे प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार, 16 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून वाई तहसील कार्यालयात महसूल प्रशासन आणि ई-सेवा केंद्र यांच्या माध्यमातून वाळूसाठी पास वितरणास सुरुवात होणार आहे.
वाईतील चार डेपोंपैकी आसले येथील डेपोमधील वाळूचा साठा घरकुल लाभार्थ्यांसाठी वापरला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 200 लाभार्थ्यांना वाळूचे पास वाटप होणार असून, टप्प्याटप्प्याने उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत वाळू पोहोचवली जाईल.
यापूर्वी पास मिळूनही वाळूच्या अनुपलब्धतेमुळे अवैध झालेल्या पाससाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष उपाययोजना केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत या लाभार्थ्यांनाही वाळू मिळेल, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली.
या आंदोलनाचे नेते श्री. स्वप्नील गायकवाड म्हणाले, “ही प्रक्रिया सुरळीत राहील आणि वाई तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत वाळू पोहोचेल. पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
यशाचे खरे श्रेय पक्षातील पदाधिकारी आणि सामान्य लाभार्थ्यांना जाते.” गायकवाड यांनी सर्वसामान्यांसाठी लढण्याचे समाधान आणि यातून मिळालेली ऊर्जा आत्मविश्वास देणारी असल्याचे सांगितले.
चौकट: स्वप्नील गायकवाड यांचे सर्वसमावेशक नेतृत्व
श्री. स्वप्नील गायकवाड यांनी घरकुल लाभार्थ्यांसाठी चिकाटीने लढा देत आंदोलन यशस्वी केले. गोरगरीब आणि कष्टकऱ्यांसाठी समाजात कोणीतरी लढत आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. त्यांचे सर्वसमावेशक नेतृत्व सामान्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.













