कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात इस्राईल येथे रोजगाराच्या संधी शिबीराचे आयोजन
सातारा दि. 31 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत सातारा
जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या अनुषंगाने 6 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कनिष्का नर्सिंग कॉलेज, पोलीस स्टेशन जवळ, सदर बझार, सातारा येथे आरोग्य क्षेत्रातील इस्राईल मधील रोजगार संधी या विषयी शिबीराचे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.
इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (HOME BASED CAREGIVER) या क्षेत्रात युवक युवतींना रोजगाराची संधी आहे. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (ऑन जॉब ट्रेनिंग सह). भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए, एएनएम जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील जास्तीतजास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी या कॅम्पला उपस्थित राहावे व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा.













