बहाळमध्ये पाच हजार महिलांनी ओढला पांडुरंग महाराजांचा रथ रथोत्सवात प्रथमच महिलांना मिळाला मान
चाळीसगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील
बहाळ येथील १९३ वर्षांची परंपरा असलेल्या श्री पांडुरंग महाराज रथोत्सवात यंदा इतिहास घडला. प्रथमच महिलांना रथ ओढण्याचा मान देण्यात आला. तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या सुमारे पाच हजार महिलांनी एकत्रितपणे रथ ओढत परंपरेत नवा अध्याय लिहिला. या सोहळ्याला सुमारे १५ हजार भाविकांची उपस्थिती होती. फुलांनी आणि फळांनी सजविलेल्या रथाला महिलांनी दोराच्या साहाय्याने ओढण्यास सुरुवात करताच परिसर भक्तिमय झाला. सजविलेल्या रथाला विठ्ठलाच्या मूर्ती विराजमान करण्यात आली होती रथावर भालदार चोपदार व घोड्यांना हाकणारा सारथी केला होता. त्यामुळे महिलांसाठी हा क्षण भावनिक ठरला. वर्षानुवर्षे चालत आलेल्या रथोत्सवात महिलांना प्रथमच मिळालेला हा सन्मान विशेष आकर्षण ठरला. रथोत्सवात महिलांनाही रथ ओढण्याची संधी मिळावी, असा प्रस्ताव मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष भोई यांनी पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांसमोर मांडला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महिलांच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला. परंपरा कायम ठेवत महिलांना समान सन्मान देण्याच्या या निर्णयाचे रथोत्सवात विशेष महत्त्व अधोरेखित झाले. महिला सक्षमीकरण आणि धार्मिक परंपरा यांचा संगम या उत्सवातून पाहायला मिळाला. या रथोत्सवाला डीवायएसपी विजयकुमार ठाकुरवाड, नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण, उमंग महिला अध्यक्ष संपदा पाटील, माजी सभापती स्मितल बोरसे आणि ग्रामविकास अधिकारी विजया पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोठी गर्दी लक्षात घेता डीवायएसपी सह्याद्री बिर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. रथोत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंदिर समिती आणि महिला स्वयंसेवकांनी व मंदिर समितीचे सदस्यांनी परिश्रम घेतले. महिलांनी रथ ओढण्याचा मान मिळविल्याने १९३ वर्षांच्या परंपरेत ऐतिहासिक नोंद झाली. रथाला मोगरी लावण्याचे काम सुतार समाजाच्या वतीने करण्यात आले












