फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई बनावट आधार कार्ड प्रकरणी बांगलादेशी महिलेला कारावास
फलटण प्रतिनिधी.
दुधेबावी ता. ९ : बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाची दिशाभूल करून भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी महिलेला फलटण प्रथमवर्ग न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
अंजला शारदाद खातून ऊर्फ सलमा अक्तारसदान ऊर्फ सलमा हाजीर शेख (वय ३३, मूळ रा. जिरानगसा, रामपूर, शरशा, जशहोर, बांगलादेश) ही महिला नऊ जून २०२५ रोजी भिलकटी (ता. फलटण) येथील १८ फाटा परिसरात बनावट आधारकार्ड व कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या राहात असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडीत
ठेवले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीविरुद्ध सबळ पुरावा निष्पन्न झाल्याने न्यायालयाने तिला दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
फलटणचे पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तपासकामी कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांनी सहकार्य केले. सरकारी अभियोक्ता अॅड. शमा बांदल यांनी, तर कोर्ट पैरवी म्हणून हवालदार वैशाली नेवसे व पूजा गायकवाड यांनी कामकाज पाहिले.













