युवकांच्या पाठपुराव्याला यश! खराडेवाडी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी; काँक्रिटीकरणाच्या कामाला आमदार सचिन पाटील यांच्याकडून निधी मंजूर
प्रतिनिधी शिवाजी भोसले
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला खराडेवाडी गावातील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अखेर गावातील धडपड्या युवकांच्या अखंड पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. स्मशानभूमी परिसराचे काँक्रिटीकरण करणे या कामासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील यांनी तातडीने निधी मंजूर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते विश्वनाथ गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे निलेश सोनवलकर यांनी या समस्येबाबत सातत्याने वरिष्ठ पातळीवर यशस्वी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी तातडीने निधी मंजूर करून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे.
खराडेवाडी गावातील स्मशानभूमी परिसरात सोयी-सुविधांअभावी चिखल व दुरवस्था होत असल्याने अंत्यसंस्कार व इतर विधींच्या वेळी ग्रामस्थांना, विशेषतः पावसाळ्यात, मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या परिसरात काँक्रिटीकरण असल्यामुळे हा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत होणार आहे. कित्येक वर्षांची ही रखडलेली समस्या सुटल्याने संपूर्ण खराडेवाडी गावातील ग्रामस्थ तसेच जय हनुमान नव तरुण मंडळ, खराडेवाडी यांच्यावतीने विशेष आनंद व्यक्त करण्यात आला.
गावाच्या या अत्यंत गरजेच्या कामासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, युवक नेते अभी भैय्या, तसेच स्थानिक पातळीवर विशेष मेहनत घेणारे विश्वनाथ गायकवाड, निलेश सोनवलकर आणि रशिद पठाण यांचे संपूर्ण खराडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत. गावातील युवकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत विकासकामासाठी दाखवलेली ही एकजूट सध्या तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.












