महिलांच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणारा अट्टल चोरटा गजाआड; फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १४ गुन्हे उघड
फलटण प्रतिनिधी
फलटण:महिलांच्या डोळ्यात चटणी टाकून मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आणि विडणी भागातील शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणाऱ्या एका २० वर्षीय सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला मोठे यश आले आहे. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मागच्या अवघ्या १० दिवसांत केलेल्या धडक कारवाईत एकूण १४ गंभीर गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अथर्व उर्फ चिन्मय सुतार पोलिसांच्या जाळ्यात
१३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत विडणी गावच्या शिवारात एका महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून, गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली होती. यासोबतच विडणी भागातील शेतकऱ्यांचे शेतातील मोटार पंप चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २० वर्षे, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
एकूण १४ गुन्हे उघड, ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने विडणी व आसपासच्या भागातून एकूण ८ ठिकाणी मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून जबरी चोरीचे ७ गुन्हे, डीपी चोरीचा १ गुन्हा आणि मोटार चोरीचे ६ गुन्हे, असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीला गेलेले दागिने आणि पाण्याच्या मोटारी परत मिळाल्याने संबंधित पीडित महिला आणि स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.
या पथकाने केली कामगिरीही उल्लेखनीय कामगिरी
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ (सहा. पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, विक्रम बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी या धडक कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.












