पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी; चालक फरार
विशेष. प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोडवर एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देऊन काही अंतरापर्यंत ओढत नेले. या हृदयद्रावक अपघातात संस्कृती राजू पिसे (वय २१, रा. रत्नागिरी) या तरुणीचा मृत्यू झाला असून, अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक राजेंद्र ओतारी (वय २७, रा. शिरवळ, सातारा), ऋतिक आणि संस्कृती पिसे हे तिघे जण दुचाकीवरून (क्रमांक MH 11D X 8293) सर्व्हिस रोडने जात होते. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शिंदेवाडी पुलाखाली आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका उत्तर प्रदेशातील ट्रकने (क्रमांक MH 16 AY 9339) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून उडवले.
अपघातानंतर चालक ट्रक सोडून फरार
ट्रक चालक करमहुसेन गयासुदिदन चौधरी (रा. आमगाव, उत्तर प्रदेश) हा अपघात घडल्यानंतर तात्काळ आपले वाहन घटनास्थळीच सोडून पळून गेला. या अपघातात दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले असून दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.
राजगड पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी प्रतीक ओतारी याने दिलेल्या तक्रारीवरून राजगड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), २८१, १२५ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबर आणि पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.












