महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचे दागिने लुटले; फलटण ग्रामीण पोलिसांनी २० वर्षीय आरोपीला ठोकल्या बेड्या
फलटण, दि. १४ ऑगस्ट २०२६ : शेतातून काम करून घरी परतणाऱ्या महिलेचा निर्जन ठिकाणी पाठलाग करून तिच्या डोळ्यांत चटणी टाकत गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने लुटणाऱ्या २० वर्षीय आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिला शेतातून काम करून घरी जात असताना निर्जन ठिकाणी आरोपीने तिच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर उसाच्या शेतातून पळत येत तिचा पाठलाग केला. महिलेच्या जवळ आल्यानंतर आरोपीने तिच्या डोळ्यांत चटणी टाकली आणि गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने काढून घेत तेथून पळ काढला.
या घटनेनंतर महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन तपास पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी विडणी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने सोन्याचा दागिना चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. केळवळ येथे फिरण्यासाठी जाण्याकरिता पैशांची गरज असल्याने चोरी केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले, अशी माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.
अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार याच्यावर तपास करून अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
तपास पथकामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे आणि अविनाश शिंदे यांनी सहभाग घेतला.
महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून दागिना लुटण्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची दिशा निश्चित करत आरोपीला जेरबंद केल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.













