सोलापूर येथे गोंडवाना विद्यापीठाच्या महिला कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी 👉 क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमात सहभाग,तिनं स्पर्धांमध्ये मानाचे पुरस्कार 

सोलापूर येथे गोंडवाना विद्यापीठाच्या महिला कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी

👉 क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमात सहभाग,तिनं स्पर्धांमध्ये मानाचे पुरस्कार 

गडचिरोली, (चक्रधर मेश्राम)दि. 21/06/2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे दिनांक १५ ते १७ जून २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ नियमित सेवेत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील महिला कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. राज्यातील विविध विद्यापीठांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाने संपन्न झालेल्या या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, रोड ड्रेस स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे गोंडवाना विद्यापीठाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे. क्रीडा स्पर्धांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कला, संस्कृती आणि प्रतिभेचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि संघभावनेने कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण केली. सांस्कृतिक उपक्रम हे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे या सहभागातून अधोरेखित झाले.

या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये कु. माधुरी परसे (संघनायक), कु. बबिता दुपारे (व्यवस्थापक), कु. दीपाली निखारे, कु. प्रज्ञा तावाडे, कु. लक्ष्मी इरपाते, कु. शालू शिवणकर, कु. वनश्री बोबाटे, कु. ऋतुजा मडावी, कु. गंगा राठोड आणि कु. हेमलता मोगरे यांचा समावेश होता.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठात मा. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या उपस्थितीत महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. कावळे यांनी महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून ही कामगिरी विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. तसेच भविष्यातही विविध क्षेत्रांत अशाच प्रकारे यश संपादन करून विद्यापीठाचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या प्रसंगी अधिसभा सदस्य श्री. सतिश पडोळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. मनोज जाधव, उपाध्यक्ष श्री. महादेव वासेकर, संघटनेचे सदस्य श्री. प्रवीण पहाणपटे,. योगेश सोपानकर, विजय जाधव, कु. मनिषा फुलकर, कु. अश्विनी मरसकोल्हे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी विजेत्या महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले. महिला कर्मचाऱ्यांच्या या यशामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा, सांस्कृतिक व संघभावनेच्या परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून संपूर्ण विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें