कोणाच्या पदरी पडणार नगराध्यक्ष पदाची धुरा, उत्सुकता शिगेला, उद्या होणार फैसला
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष व 36 नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रकिया 2 डिसेंबर रोजी पार पडली 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार होता. पण ऐनवेळेस निकालाची २१ तारीख करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. परंतू आता निकालाची तारीख उद्यावर आली असून अवघ्या २४ तासात निकाल जाहिर होणार आहे,
कोण नगरध्यक्ष म्हणून निवडून येणार याची ‘प्रतिक्षा’ चाळीसगावकरांना लागली आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आता शहराचे लक्ष उद्या, 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. नगराध्यक्षपदासाठीची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून कोण बाजी मारणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवार पद्मजा राजीव देशमुख यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोर लावल्याने निकालाबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मतदानाच्या दिवशी शहरात समाधानकारक मतदान झाले असून काही प्रभागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निकाल जाहीर होताच शहराला नवा नगराध्यक्ष मिळणार आहे. नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, भाजप की शहर विकास आघाडी या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार असून शहराच्या राजकारणाला नवे वळण मिळणार आहे. चाळीसगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ४ तर नगरसेवकांच्या ३६ जागांसाठी ११९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या मतदारांचा फैसला ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपद तसेच नगरसेवकांच्या ३६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ६२.५८ टक्के मतदान झाले आहे होते मतमोजणी उद्या दि.२१ रोजी संकाळी १० वाजेपासून सुरु होणार असून मतमोजणीसाठी १६ टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.













