फलटणमध्ये ‘ विकासाचा चढता आलेख ‘! “शब्द दिलाय तो पूर्ण करणारच!” – रणजीतदादांचा ‘ॲक्शन प्लॅन’ सज्ज! “
फलटण, दि. ०६ मार्च : फलटण नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले तसेच मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीस नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, संदिप चोरमले, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, किरण जाधव तसेच नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, सुपर्णा सनी अहिवळे, रूपाली अमोल सस्ते, मिना काकडे, मोहिनी हेंद्रे, कुमारी सिद्धाली अनुप शहा आदी उपस्थित होते.
याशिवाय स्वराज सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, सनी (भैय्या) मांढरे व श्रीवल्लभ हेंद्रे यांनीही उपस्थिती दर्शवली.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरपरिषदेच्या सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.
*१०० कोटींच्या विकासकामांना गती*
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण शहराला दिलेले सर्व शब्द पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद, राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून सुमारे १०० कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत. यामध्ये नगरपरिषदेकडील २० कोटी आणि विविध योजनांतील ८० कोटींचा निधी समाविष्ट आहे.
उद्यान, रस्ते, नाट्यगृह, तारांगण, हॉस्पिटल यांसारखी अनेक विकासकामे मंजूर झाली असून ती लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तसेच आमदार सचिन पाटील यांनी रस्त्यांसाठी १६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहितीही देण्यात आली.
*हद्दवाढ व ‘अ’ वर्ग नगरपरिषदेकडे वाटचाल*
फरांदवाडी, ठाकुरकी, जाधववाडी आणि चौधरवाडी या गावांचा समावेश करून फलटण नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव असून, भविष्यात अ वर्ग नगरपरिषद बनवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
*शहर विकासासाठी महत्त्वाच्या योजना*
* बैठकीत शहर विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय व प्रस्ताव मांडण्यात आले, त्यामध्ये –
* शहरातील प्रमुख चौकांत १० सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे
* पालखी महामार्गावरील चौकांचे सुशोभीकरण
* पाण्याच्या पाईपलाईनसाठी ८ कोटींचा अतिरिक्त निधी
* दलित वस्तीसाठी ८ ते ९ कोटींची विकासकामे
* दगडी पुलाजवळील नाल्यासाठी साडेतीन कोटींचा निधी
* फरांदवाडी परिसरात १७ एकरांवर भव्य क्रीडांगण उभारणे
* विमानतळ परिसरात हेलिपॅड, हॅंगिंग गार्डन व ॲमिनिटी पार्क
* शहरात उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे व कंट्रोल रूम उभारणे
* नगरपालिका इमारतींवर सोलार प्रकल्प राबवून वीजबिल कमी करणे
* शहरात विविध ठिकाणी पार्किंग सुविधा उभारणे
* तसेच सुपर मार्केटची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी पार्किंग व आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
*निकृष्ट कामांवर कठोर कारवाई*
कामे वेळेत न करणाऱ्या किंवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा ठेकेदारांची ठेव रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला.
*जिल्हा मुख्यालयासारखे शहर विकसित करण्याचा संकल्प*
फलटण जिल्हा होण्याच्या दृष्टीने शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त करत रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटण भविष्यात जिल्ह्याचे मुख्यालय होऊ शकते. त्या दृष्टीने शहराची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.”
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्तांतर झाले असले तरी फलटण शहरात विकासकामांचा चढता आलेख कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.












